श्रीनिवास बेलसरे

बासुदांचा ‘छोटीसी बात’ (१९७५) एक लॅण्डमार्क सिनेमा होता. एकेकाळी या सिनेमामुळे बॉिलवूडमध्ये एक ट्रेंड आला होता. मध्यमवर्गीय प्रेक्षकांत अमोल पालेकर आणि विद्या सिन्हाला विक्रमी लोकप्रियता याच सिनेमाने मिळवून दिली. मुंबईचा सर्वात पॉश भाग असलेल्या नरिमन पॉइंंटमधील दोन खासगी कंपनीत काम करणारे अरुण प्रदीप (अमोल पालेकर) आणि प्रभा नारायण (विद्या सिन्हा) यांची ही प्रेमकहाणी!

एकेकाळी मुंबई नावाचे महानगर भारतीय उपखंडातील असंख्य लोकांच्या आकर्षणाचे केंद्र होते आणि १९७५ची मुंबई होतीही तशीच! तरुणांना हवीशी वाटणारी मनमोकळी संस्कृती, टापटिपेचे राहणीमान, सतत वेगाने धावणाऱ्या लोकल ट्रेन्स, घाईघाईतही जीवन जगणे साजरी करणारी, सतत प्रगती करणारी आधुनिक महानगरी! एकेकाळी मुंबई अनेकांची स्वप्ननगरी होती.

अमोल बस स्टॉपवर दिसलेल्या निरागस विद्याच्या प्रेमात पडतो आणि कथा सुरू होते. काहीसा घाबरट अमोल प्रेम व्यक्त करू शकत नसल्याने तिचा पाठलाग मात्र करतो आणि काहीतरी संधी शोधून तिच्या ऑफिसात जातो. हळूहळू विद्याच्या हे लक्षात येते आणि तिलाही त्याचा निरागसपणा भावतो.

मात्र स्पर्धेच्या जगात अमोलला प्रेमातही यश मिळत नाही. मग तो लोणावळ्यातील एका व्यक्तिमत्त्व विकास केंद्राला भेट देऊन तयारी करून येतो आणि त्याचे प्रेम यशस्वी होऊ लागते. अमोल अतिशय खूश होतो. तो जवळजवळ हवेत तरंगत असतो. ती धुंद मन:स्थिती चितारणारे एक सुंदर गीत योगेश यांनी लिहिले होते. संगीत सलिल चौधरी यांचे.

ये दिन क्या आये…
लगे फूल हँसने,
देखो बसंती-बसंती,
होने लगे मेरे सपने…

माणूस पहिल्यांदा प्रेमात पडतो तेव्हा असेच तर होते. सगळा आसमंत जणू फुलांनी बहरलेला आहे आणि ती चिमुकली फुले आपल्याकडे बघून स्मितहास्य करीत आहेत, असे वाटते. आजूबाजूला जणू निशिगंधाचा सुवास दरवळत राहतो. हिमालयाच्या उतरंडीवर केशराची शेती फुलावी तशी सगळी सृष्टी जांभळी, केशरी, स्वप्नवत बनून जाते! तरुण हृदयातील प्रेमभावना सगळे भावविश्वच कवेत घेत असते. जगणेच जणू ‘चार्ज’ झालेले असते. दिवसभर एखादे गाणे गुणगुणले जावे, तसा दिवस संगीतमय होतो. सकाळच्या सोनेरी उन्हातील ऊब प्रथमच जाणवते. तिच्या आठवणीच्या आकाशात हरवलेले मन त्या सकाळच्या सोनेरी प्रकाशात विहरत राहते…

मुंबईला सगळ्या बाजूने समुद्राने वेढले आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरची संध्याकाळ विशाल रूप धारण करत असते. पश्चिमकडचे क्षितिज एकाचवेळी नजरेच्या टप्प्यात येत असल्याने आकाश संध्याकाळी सोनेरी, केशरी तांबूस होत होत निळे, धूसर आणि करडे होऊन जाते… सूर्य जगाचा निरोप घेताना काहीसा रेंगाळतो. म्हणून योगेश लिहून गेले – ‘माझी सकाळ सोनेरी होते, तर संध्याकाळ रोज गुलालाने भरून लाल लाल होते.’

सोने जैसी हो रही है, हर सुबह मेरी
लगे हर सांझ अब, गुलालसे भरी

गाणे सलिलदांनी मुद्दाम मुकेशला दिले. त्याचा सौम्य, सात्त्िवक आणि नितळ आवाज सोन्यापेक्षा चांदीकडे, चांदण्याकडे झुकतो. बासुदा हे सगळे अमोलच्या मन:स्थितीशी एकरूप करून टाकतात. मुंबईत दिवसभर हवा कितीही कुंद असली तरी सायंकाळी थंड झुळुक सुरू होतात –

चलने लगी महकी हुई,
पवन मगन झुमके,
आँचल तेरा चुमके,
ये दिन क्या आए…

मनात प्रियेची प्रतिमा सतत विलसत असल्याने येणाऱ्या भावनाही चित्रकाराने नुसते रंगीबेरंगी ब्रशने कॅन्व्हासवर फराटे मारावेत आणि एक आभास निर्माण करावा तशाच तुटक तुटक अर्धवट स्वरूपात येत राहतात, जात राहतात –

वहाँ मन बावरा, आज उड चला,
जहाँपर है गगन, सलोना-साँवला
जाके वहीं रख दे कहीं, मन रंगोंमें खोलके
सपने ये अनमोलसे…
ये दिन क्या आए…

जे दिवस पुन्हा कधीच येऊ शकणार नाहीत, त्यांच्या नितळ, निरागस, आठवणींचे हे नॉस्टॅल्जिक जग! असेच एखादे मनस्वी गाणे ऐकून त्या जगात निदान चक्कर मारून यायला काय हरकत आहे?