मुंबई (प्रतिनिधी) : आर. एच. विसंगती म्हणजे काय? महिलांच्या गरोदरपणादरम्यान कशी काळजी घ्यावी, असे प्रश्न सध्या अनेकांना सतावत असतात. प्रसूती तज्ज्ञ कन्सल्टंट व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रिषमा धिल्लन पै यांनी या आणि अशा सर्व प्रश्नांचे निराकरण केले आहे.
रक्तगटांचे ए, बी, एबी आणि ओ पॉझिटिव्ह हे चार प्रमुख प्रकार आहेत हे सर्वांना माहीत आहेच. व्यक्तीमधील जनुकांनुसार निश्चित होणारा रक्तगट आई वडिलांकडून अनुवंशिकतेने येतो. शिवाय यात आर.एच. फॅक्टर नावाचे एक प्रथिन असते. आरएच पॉझिटिव्ह (+) व्यक्तींमध्ये हे प्रथिन असते, तर आर.एच. निगेटिव्ह (-) व्यक्तींमध्ये हे प्रथिन नसते. त्यानुसार रक्तगटांचे ८ प्रकार होतात.
आर. एच. विसंगती म्हणजे काय?
आर. एच. किंवा ‘ऱ्हिसस’ फॅक्टर हे एक अनुवंशिकतेने येणारे प्रथिन आहे आणि लाल रक्तपेशींवरील पेशींच्या पडद्याच्या पृष्ठभागावर ते आढळते. तुमच्या रक्तामध्ये हे प्रथिन असेल तर तुम्ही आर. एच. पॉझिटिव्ह असता आणि ते नसेल तर आर एच निगेटिव्ह असता. अर्थात, रक्तामध्ये आर. एच. असणेही एक सामान्य अवस्था आहे. याचा अर्थ त्या व्यक्तीला कोणता आजार आहे असा होत नाही किंवा याचा आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही.
अर्थात गरोदर स्त्री आर. एच. निगेटिव्ह असेल तर गरोदरपणात तिच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आर. एच. निगेटिव रक्तगट असलेल्या गरोदर स्त्रियांची विशेष काळजी घ्यावी लागते. विशेषत: तिच्या पोटातील बाळाचा रक्तगट आर. एच. पॉझिटिव्ह असेल तर आणखी काळजी घ्यावी लागते.कारण,यास्थितीला आर. एच. कम्पॅटिबिलिटी किंवा विसंगती असे म्हणतात. याचा मातेच्या आरोग्यावर फारसा परिणाम होत नाही पण तिच्या पोटातील बाळावर याचा परिणाम होऊ शकतो म्हणून तिच्या आर. एच. निगेटिव्ह रक्तगटाची विशेष काळजी घ्यावी लागते.
आईच्या शरीराची तिच्या बाळाच्या आर. एच. पॉझिटिव्ह रक्ताशी आंतर क्रिया होऊन अँटिबॉडीज (प्रतिपिंडे) तयार होतात, तेव्हा आर. एच. विसंगती निर्माण होते. विशेषत: याच स्त्रीच्या दुसऱ्या गरोदरपणात बाळ आर. एच. पॉझिटिव्ह असेल, तर तत्काळ अँटिबॉडीज तयार होतात. आर. एच. पॉझिटिव्ह बाळाची वार ओलांडून या अँटिबॉडीज गेल्या की त्याच्या लाल रक्त पेशींचे नुकसान होते. लाल रक्तपेशी शरीरात ऑक्सिजन प्रवाहित ठेवण्यासाठी अत्यावश्यक असतात. अशा परिस्थितीत लाल रक्तपेशींचे वेगाने नुकसान झाल्याने ऍनिमियासारखी अवस्था निर्माण होऊन बाळासाठी प्राणघातक ठरू शकते.
नवीन लाल रक्तपेशी निर्माण करण्याची बाळाच्या शरीराची क्षमता कमी झाल्यास कठीण होते. यातून कावीळ, हार्टफेल्युअर, यकृताचे काम मंदावणे आदी अवस्था येतात आणि बाळासाठी हे प्राणघातक ठरू शकते.
गरोदर स्त्रीची इनडायरेक्टकूम्ब्स चाचणीही साधी रक्त चाचणी करून या अवस्थेचे निदान करता येते. रक्तामध्ये पेशी नष्ट करणाऱ्या अँटिबॉडीज आहेत की नाही याचे निदान या चाचणीद्वारे करता येते आणि तुमचे डॉक्टर यावर काय करायचे त्याबद्दल सल्ला देऊ शकतात. बाळाची आई आर. एच. निगेटिव्ह असेल आणि वडिल आर. एच. पॉझिटिव्ह असेल तर इम्युनोग्लोब्युलिन इंजेक्शन आईला देऊन तिच्या शरीरात आरएचअँटिबॉडीज तयार होणे रोखता येते. गरोदरपणाच्या २८ आठवड्यांपर्यंत हे इंजेक्शन दिले जाऊ शकते आणि बाळाचा रक्तगट पॉझिटव्ह असेल तर प्रसुतीनंतर ही देता येते. या उपायांनी बाळाचे प्रभावीरित्या संरक्षण होऊ शकते.