कणकवली (प्रतिनिधी) : अनधिकृत पर्ससिनेट व एलईडी धारक मच्छीमारांकडून प्रत्येकी १० हजार रुपयेप्रमाणे दरमहा १ कोटी ८० लाख रुपये वसूल करण्याचे काम रत्नागिरी येथील किरण रवींद्र सामंत हे उघडपणे करीत आहेत, अशी लेखी तक्रार भाजप आमदार नितेश राणे यांनी मत्स्योद्योग मंत्री अस्लम शेख यांच्याकडे केली होती. पालकमंत्र्यांचे बंधू किरण सामंत कोकणातील दुसरे सचिन वाझे अशी टीका राणे यांनी पत्रकार परिषदेत केल्यानंतर हे तक्रारींचे पत्र व्हायरल होऊ लागले आहे.

पालकमंत्री यांचे बंधू किरण सामंत यांच्याविरुद्ध आ. नितेश राणे यांनी केलेला पत्रव्यवहार आणि दिलेले पुरावे जनतेसमोर येऊ लागले आहेत. अनधिकृत पर्ससिनेट व एलईडी धारकांकडून किरण सामंत कसे पैसे वसूल करतात, याचा लेखाजोखा आ. राणे यांनी मत्स्योद्योग मंत्री अस्लम शेख यांना दिला होता. त्या पत्रात त्यांनी म्हटले होते की, कोकण किनारपट्टीवर अनधिकृतरीत्या होत असलेल्या मच्छीमारीबाबत विशेषत: रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ल्यामधील पारंपरिक मच्छीमार सध्या फार मोठ्या संघर्षाद्वारे आपला निषेध वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करीत आहेत. पारंपरिक मच्छीमार व पर्ससिन मच्छीमार हा वाद जरी जुना असला, तरी सधा हा वाद उफाळून येण्यामागे शासननिर्मित चाललेला भ्रष्टाचार हे एक कारण असल्याचे मला समजते. याबाबत सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथील मत्स्य विभागातील काही अधिकारी व मच्छीमार यांचेकडून मािहती घेतली असता आपल्या खात्यामध्ये उघडपणे चाललेल्या भ्रष्टाचाराची मािहती समोर आली आहे. यासंदर्भात आमदार नितेश राणे यांनी मत्स्योद्योग मंत्री अस्लम शेख यांच्याकडे २५ मार्च रोजी तक्रार दाखल केली होती.

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण ३१५ अधिकृत पर्ससिनेट मच्छीमारांना परवाना देण्यात आला आहे; परंतु सधा १५०० अनधिकृत पर्ससिनेटधारक तसेच ३०० एल.ई.डी.धारक बेकायदेशीररीत्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मच्छीमारी करीत आहेत. या अनधिकृत पर्ससिनेट व एलईडीधारक मच्छीमारांकडून दरमहा १० हजारप्रमाणे १ कोटी ८० लाख रुपये वसूल करण्याचे काम रत्नागिरी येथील किरण रवींद्र सामंत हे उघडपणे करीत आहेत असे समजते. त्यासाठी अधिकाऱ्यांना वेठीला धरून, प्रसंगी दबाव टाकून या वसुलीच्या कामाला जुपले जात आहे. रश्मी अवुलकर नावाच्या अधिकाऱ्यांनी ६० अनधिकृत पर्ससीनधारकांवर कारवाई केली असता, त्यांची बदली अमरावती येथे करण्यात आली. याबाबत आपण वेळीच दखल घेऊन चौकशी करून संबंधित हप्ते वसूल करणाऱ्यांविरोधात लवकरच कारवाई करावी, अशी मागणी आमदार नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here