सध्या सर्वच घरांमध्ये झोपण्यासाठी बेड असतात. मोठा फ्लॅट किंवा आलिशान बंगल्यामध्ये खूप जागा असल्याने एकाहून अनेक बेडरूम्स आणि तितके बेड पाहायला मिळतात. मात्र सर्वच ठिकाणी एकाच प्रकारचा बेड नसतो. आरामदायक आणि आवश्यकता, आवड लक्षात घेऊनच बनवलेल्या आधुनिक बेडना आता प्राधान्य दिले आहे. सध्या बाजारात किंग साईझ बेड, क्वीन साईझ बेड तसेच सिंगल बेड, डबल बेड असे बेडचे अनेक प्रकार पाहायला मिळतात.
बेडचे आकारमान वगळता इतरही अनेक गोष्टी आहेत. बेडचे निरनिराळ्या प्रकारांत वर्गीकरण होऊ शकते. यात मग स्टोरेज असणारे बेड, पलंग, मेटल बेड, लहान मुलांसाठीचे बंक बेड याव्यतिरिक्त कॅनोपी बेड तसेच कँटीलिवर बेड, रॉकिंग बेड, हँगिंग बेड, पूल-आऊट बेड, इत्यादी प्रकार पाहायला मिळतात.
स्टोरेज बेड : बेडच्या आत जास्तीच्या गाद्या, उशा किंवा इतर काही सामान ठेवण्याकरिता जागा असते. भारतात विशेषकरून जिथे लहान घरे आहेत अशा ठिकाणी या प्रकारच्या बेडला जास्त पसंती दिली जाते. यात निरनिराळ्या प्रकारे आपण स्टोरेज बनवू शकतो. एका प्रकारात हायड्रोलिक पंप बिजागरांचा वापर करून गादीसकट हलकेच वर उचलले जाणारे झाकण बनवून आत स्टोरेज केले जाते, तर आणखी एका प्रकारात आपण बेडला दोन्ही बाजूंनी किंवा समोरून सहज बाहेर येतील असे ड्रॉवर बनवू शकतो. ड्रॉवर असणारे स्टोरेज वापरण्याकरिता अतिशय सुटसुटीत असते. यात बेडवर कोणी झोपले असतानाही स्टोरेजचा सहज वापर होऊ शकतो; परंतु अशा प्रकारचे बेड बनवून घेताना ड्रॉवर उघडण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे ना याची मात्र खात्री करून घ्यावी.
पलंग : हा बेडमधील एक लोकप्रिय प्रकार मानला जातो. आपल्याकडे भारतात तर पलंग फार जुन्या काळापासून वापरात असलेला दिसून येतो. याचे प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे सुटसुटीतपणा. यात स्टोरेजची सोय नसते. पलंग शक्यतो लाकडात किंवा लोखंडाचा वापर करून बनवले जातात. चार पाय आणि त्यांना जोडणारी चौकट अशी बनावट असल्याने याला चौपाई किंवा चारपाई असेदेखील म्हणतात.
कॅनोपी बेड : हा पलंगाचा एक थोडा राजेशाही प्रकार म्हणता येईल. यात पलंगाचे जे चार पाय असतात त्यांना सरळ आणखी उंच करून पलंगाच्या डोक्यावर एक चौकट उभारली जाते. याचा उपयोग मच्छरदाणी किंवा सजावट म्हणून पडदे सोडण्यासाठी होतो. अशा प्रकारचे बेड हे शक्यतो मोठय़ा बेडरूममध्ये अवाढव्य आकारात चांगले दिसतात.
कँटीलीवर बेड : मुबलक जागा, आवड व पशाचे गणित एकत्र जुळून आले तर आपण या प्रकारचा निश्चित विचार करू शकतो. या प्रकारात दोन समध्रुवी शक्तिशाली चुंबकाचा वापर करून बेड अक्षरश: तरंगता ठेवता येतो. थोडा जादूच्या प्रयोगांसारखा वाटणारा हा प्रकार आपल्या घरातील इंटेरियरची उंची कुठच्या कुठे नेऊन ठेवू शकतो.
रॉकिंग बेड : मुबलक जागेची अट इथेही आहेच. जशी आपली रॉकिंग खुर्ची असते त्याच धर्तीवर रॉकिंग बेड बनवला जातो. याचा तळभाग अर्धगोलाकार असून झोपून पायाने दाब दिला असता तो छान डुलू लागतो.
हँगिंग बेड : झोपाळा अनेकांच्या आस्थेचा विषय असतो. लहानांपासून मोठय़ांपर्यंत झोपाळ्याचे आकर्षण सर्वानाच असते. हा बेड म्हणजे एक मोठा झोपाळाच भक्कम दोरखंडांनी छताला लटकवला जातो. अशा प्रकारचे बेड बनवताना त्याच्या भक्कमपणाची विशेष काळजी घेणे आवश्यक असते.
बंक बेड : लहान मुलांना साधं, सोप्पं, सरळ असं काही आवडतच नाही. त्यांना प्रत्येक वस्तूमध्ये काही तरी नावीन्य हवं असतं. या नावीन्याचा विचार करून बंक बेडची कल्पना केली गेली असावी. बंक बेड म्हणजेच एकाच्या डोक्यावर एक एक असे रचलेले बेड. बंक बेड मुलांची वैचित्र्याची हौस पूर्ण करतातच, पण त्याचसोबत जागा वाचवण्याचेही काम करतात. विशेषत: लहान बेडरूममध्ये दोन मुलांसाठी दोन वेगवेगळे बेड करून जागा अडवण्यापेक्षा बंक बेड करून इतर जागा मुलांना खेळण्यासाठी किंवा इतर काही फर्निचर ठेवण्यासाठी उपयोगी पडू शकते. बंक बेड हा नुसताच बेड नसून, काही वेळा त्याला एखाद्या युनिटप्रमाणे डिझाईन करता येते. मग यामध्ये वरच्या बाजूला बेड आणि खाली स्टडी टेबल, कपाट, बुकशेल्फ यामधील काहीही बसवता येते.
पूल आऊट बेड : लहान बेडरूम आहे किंवा एकाच खोलीचा निरनिराळ्या गरजांनुसार वापर करायचा आहे अशा ठिकाणी पूल-आऊट बेड हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. याचे वैशिष्टय़ म्हणजे, बंद असताना हा एखाद्या सिंगल बेडप्रमाणे वापरता येतो. याच्या खालील बाजूस ड्रॉवरप्रमाणे बाहेर ओढता येणारा दुसरा बेड असतो. याचा उपयोग दोन सिंगल बेडप्रमाणे किंवा गादीमध्ये थोडे फेरफार करून डबल बेडप्रमाणेदेखील करता येतो. लहान मुलांच्या खोलीत किंवा पाहुण्यांच्या खोलीत अशा प्रकारचे बेड वापरले जातात.
हेडबोर्ड हा फक्त उशी घेऊन मागे टेकून बसण्यासाठी असतो. अर्थात तो जरी त्याचा मूळ उद्देश असला तरीही हेड बोर्ड, बेडचे सौंदर्य खुलविण्यात मोलाचा वाटा उचलतो. अगदी दोन फूट उंचीपासून ते छतापर्यंत उंचीचे हेड बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. लाकूड, स्टीलमध्ये, रेक्झिन किंवा कपडय़ांनी आच्छादलेले अशा अनेक प्रकारे हेड बोर्ड बनवले जाऊ शकतात. शिवाय शक्य असल्यास हेड बोर्डमध्ये शोकेसचादेखील अंतर्भाव करता येतो. सध्या बाजारात उंच हेड बोर्डची जास्त चलती आहे.