रोहन राऊळ

जाहिरात या चौसष्टाव्या कलेच्या क्षेत्रात कॅमेरा हे आधुनिक साधन शिरलं आणि अनेकांना त्याची भुरळ पडली. या कॅमे-याचा वापर करीत अनेकांनी जाहिरात क्षेत्रात कर्तबगारी गाजवली. क्रेझल मीडिया एंटरटेनमेंटचे संचालक आणि संस्थापक वैभव बोरकर यांनीही हाच कॅमेरा कुशलतेने हाताळत चिकाटी आणि कलाकुसरीच्या जोरावर या क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलं आहे.

वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी वैभव बोरकर यांचं पितृछत्र हरपलं. आई रेखा बोरकर यांनी दवाखान्यात कंपाऊंडरचं काम करीत घरगाडा चालवण्यास सुरुवात केली. आर्थिक स्थिती बिकट होती. त्यात लहानग्या वैभवच्या करिअरला कोणती दिशा द्यावी, हा प्रश्न आईला भेडसावत होता. त्या दवाखान्यात परिचितांकडे याबाबत मार्गदर्शनासाठी विचारत असत. त्यातून काही जणांनी वैभवला अ‍ॅनिमेशन अ‍ॅडव्हर्टायझिंगचं प्रशिक्षण द्या, असा सल्ला दिला. त्यानुसार, बारावी करीत असताना वैभव यांनी दुसरीकडे अ‍ॅनिमेशन शिकायला सुरुवात केली. पाच वर्षे झपाटल्याप्रमाणे ते शिकत होते. त्यांना आपली आवड गवसली होती. तब्बल २७ सॉफ्टवेअरचं तंत्र त्यांनी अल्पावधीत अवगत केलं.

बोरकर यांनी याच क्षेत्रातील एका कंपनीत नोकरी पत्करली. कारण घरची जबाबदारी त्यांच्यावर होती. ग्राफीकचं काम तर ते करायचे, पण त्यावेळी यू- टय़ूबवर सध्या या क्षेत्रात सध्या काय चाललंय, कशाला अधिक प्रतिसाद आहे, याचाही अदमास ते घेत होते. एव्हाना अ‍ॅडफिल्म तयार करण्यात त्यांचा हातखंडा झाला होता. नोकरीत असताना ब-यापैकी प्रशिक्षण घेत नोकरीला रामराम ठोकत त्यांनी स्वत:च्या उद्योगाचा श्रीगणेशा करायचं ठरवलं. लागलीच बोरिवलीतील श्री गणेशा हॉस्पिटलची अ‍ॅडफिल्म तयार करण्याचं काम त्यांना मिळालं, हाही योगायोगच.

या उद्योगात त्यांचा जम बसायचा असतानाच एक अपघात झाला. एका शूटिंगचं काम सुरू असताना किमती कॅमेरा पडून फुटला. कॅमे-याची किमत होती तब्बल बारा लाख. या उद्योगासाठी कर्ज काढून घेतलेला कॅमेराच निकामी होणं हा एक मोठाच आघात होता. दुसरा कुणी खचून गेला असता. पण लढाईत कच खाणं वैभव यांच्या स्वभावात नव्हतं. त्यांनी या अपघाताचंही संधीत रूपांतर करायचं ठरवलं. या कर्जातून बाहेर पडण्यासाठी गप्प बसून चालणार नव्हतं तर एक मोठी झेप घेणंच आवश्यक होतं. त्यांनी नेटाने झेप घेऊन हे कर्ज फेडायचं ठरवलं.

आपल्या क्रेझल मीडिया एंटरटेनमेंटचा पाया भक्कमपणे रोवायचा निर्धार त्यांनी केला. थ्रीडी व्हिज्युअलायझर, अ‍ॅनिमेशन टूडी, थ्रीडी, आर्किटेक्चर, अ‍ॅडव्हर्टायझिंग, लोगो प्रॉडक्शन ही त्यांची खासियन. त्यांचा दुसरा क्लायंट होता अनुपम. त्यानंतर त्यांची अप्रतिम जाहिरातपट पाहत तुंगा हॉस्पिटल, साई पॅलेस ग्रुप ऑफ हॉटेल्स, मेट्रो पोल, स्पेस इन आर्ट अ‍ॅडॉब असे अनेक क्लायंट त्यांना मिळत गेले. कंपनी प्रेझेंटेशन्स, आर्किटेक्चर वॉक थ्रू, थ्रीडी व्ह्यूज, कॉर्पोरेट फिल्मस, प्रॉडक्ट ब्रँडिंग, सोशल मीडिया, मोशन ग्राफीक, प्रॉडक्ट मॉडेल फोटोग्राफी अशी सर्व प्रकारची तांत्रिक काम ते कुशलतेने पार पाडतात. याशिवाय साऊंडसंबंधित आणि फिल्ममेकिंगची सारी कामं ते हाताळतात.

क्लायंटचा विश्वास हेच माझं मुख्य भांडवल आहे, असं वैभव बोरकर सांगतात. कदाचित त्यांच्या या विचारसरणीमुळेच त्यांचे क्लायंट मुंबईप्रमाणेच मुंबईबाहेरही पसरत गेले. आजमितीस त्यांच्या कामाला लोणावळा, नाशिक, गोवा, नागपूर तसंच मंगळूरुसारख्या राज्याबाहेरील शहरातूनही क्लायंटकडून मागणी असते. अ‍ॅडसंबंधित सर्व प्रकारची कामं ते करीत असले तरी हेल्थकेअर ही त्यांची स्पेशालिटी झाली आहे. अनेक नामांकित डॉक्टरांचा त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने कदाचित त्यांना हे साध्य झालं असावं. त्यासाठी अत्यंत बिकट आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचं लाईव्ह शूटिंग त्यांना करावं लागतं. अशी कठीण कामच त्यांना अधिक आवडतात.

गेल्या सहा-सात वर्षात त्यांनी आपली सात जणांची भक्कम टीम तयार केलीय. त्यांच्या सहकारी भाविका रेंगे या मार्केटिंगपासून ऑपरेशनपर्यंतची सारी कामं हाताळतात. श्रीकांत कदम यांचीही त्यांना मदत होते. शूटिंगबाबतची सगळी तंत्रं अवगत केल्यानंतर आपल्या कामाबाबत ते म्हणतात, कमर्शियल्स म्हणजे जाहिरातपट तयार करणं मला अधिक भावतं. कारण यात अल्पावधीत ‘आऊटपूट’ मिळतं. क्लायंटचं समाधान पाहून आपले श्रम सत्कारणी लागल्याचा आनंद मिळतो. जाहिरातबाजीच्या वेगळय़ा क्षेत्रातील किएटिव्ह तरुणाची घोडदौड नक्कीच उल्लेखनीय आहे.